वाढता उन्हाळा, तापमानवृद्धी आणि पर्यायाने खालावत जाणारी पाणी पातळी यामुळे पुणे शहरात पाणी टंचाईचे सावट निर्माण झाले असून याच कारणाने शहरात दर गुरुवारी पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येत आहे.

दर गुरुवारी पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येत असून पुढचे तीन दिवस, अनुक्रमे शुक्रवार, शनिवार आणि रविवार या दिवशी पाणी पुरवठा कमी दाबाने होत आहे. यामुळे नागरिकांची त्रास होत असून पाण्याची उन्हाळी सुट्टी संपणार तरी कधी असा प्रश्न विचारला जात आहे.

यावर नागरिकांसाठी पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस अर्बन सेलच्या वतीने पाणी पुरवठा विभागाच्या मुख्य अभियंत्यांना निवेदन देण्यात आले आहे. यामध्ये प्रामुख्याने शहरातील कोणत्याही भागात पाणी पुरवठा पूर्णपणे बंद न करता कमी करावा तसेच कमी दाबाने येणाऱ्या पाण्याचे योग्य नियोजन करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

याचसह सहसा मनपातर्फे पाणी पुरवठा बंदनंतर देण्यात येणाऱ्या एअर लॉक या उत्तरावरही उतारा दिला असून ठिकठिकाणी एअर व्हॉल्व्ह बसवल्यास सदर प्रश्न लवकरच निकालात निघू शकतो. यावेळी मनपाने एखाद्या कर्मचारी अथवा अधिकाऱ्यावर ही जबाबदारी सोपवल्यास हे काम अधिक वेगाने पार पडू शकते, असेही नमूद करण्यात आले आहे.

यावर मनपाने सकारात्मक प्रतिसाद देत योग्य कार्यवाही केल्यास लवकरच पुणेकरांची तहान भागेल, यात शंकाच नाही.

यावेळी पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस अर्बन सेलचे अध्यक्ष नितिन कदम, मी स्वतः व अर्बन सेलचे सहकारी उपस्थित होते.

– श्री. स्वप्नील दुधाने.
उपाध्यक्ष, पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी